http://thebattleforsanskrit.com/key-debates-in-the-battle-for-sanskrit/
संस्कृतच्या ताब्यासाठी चाललेल्या लढ्यातील महत्वाचे मुद्दे
लेखक : राजीव मल्होत्रा, मराठी अनुवाद : आर. एम. टीम
संस्कृत आणि संस्कृती जिवंत आणि पवित्र असण्याबरोबरच मोक्षप्राप्तीचे स्रोत आहेत असे मत ‘द बॅटल फॉर संस्कृत’ (The Battle for Sanskrit) या पुस्तकातून मांडण्यात आले आहे. तथापि, आपल्या परंपरेस जोपासणारे+ याविषयी काय करतील त्यावर भविष्य अवलंबून आहे. मोठा परिणाम तेव्हाच घडून येईल जेव्हा खरेखुरे संस्कृत विद्वान आणि भारतातील महत्वाच्या संस्था या कुरुक्षेत्रात बदल घडवण्याच्या हेतूने उतरतील. एका जुन्या उक्तीनुसार, जो आपल्या विचारांन्वये कार्यही करतो तोच पंडित ठरतो (य: क्रियावान: स: पण्डित:). केवळ आरामखुर्चीवर बसून मोठ्या गोष्टी करणाऱ्या पंडितांकडून बदल घडवला जाऊ शकत नाही.
या पुस्तकाच्या परिणामस्वरूप पुढे येऊ शकणाऱ्या मुद्द्यांची व चर्चांची यादी मी सदर करू इच्छितो. यांपैकी अगदी थोड्या चर्चांमध्येही जर आपल्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, पुरेशी माहिती असणाऱ्या विद्वानांनी भाग घेतला तर ते बाजी पलटवू शकतात. पायाभूत भक्कम ज्ञान आणि वादविवादाचे कौशल्य प्राप्त करून धार्मिक परंपरांचे आत्मविश्वासाने प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ बौद्धिक क्षत्रियांना’ प्रशिक्षित करण्यासाठीही हा सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच या चर्चांमधून उत्पन्न झालेले ज्ञान शिक्षण, संस्कृती, आरोग्य, धार्मिक बाबी, विदेशनीती आणि प्रसारमाध्यमांमधील योजना तयार करणाऱ्यांपर्यंत पोहोचवले जावे (अशी माझी इच्छा आहे). पुढील प्रत्येक चर्चेच्या अनुषंगाने मी माझे मत मुद्देसूदपणे मांडले आहे.
भारताच्या बौद्धिक मांडलिकत्वास विरोध
१. संस्कृत अभ्यासाच्या अधिकार इतरांकडे सुपूर्द करणे
‘द बॅटल फॉर संस्कृत’ हे पुस्तक अमेरिकन प्राच्यविद्या (ओरिएंटलिझम्, Orientalism) संशोधकांकडून केले जाणारे शृंगेरी पीठाचे पाश्चात्त्यीकरण टाळण्यासाठी मी चालवलेल्या मोहिमेची फलश्रुती आहे. अशा प्रकारचा (धार्मिक परंपरांच्या) अपहरणाचा प्रयत्न काही अनिवासी भारतीयांच्या आर्थिक पाठबळावर तसेच शृंगेरी येथील उच्च पदस्थांच्या मदतीद्वारे केला जात आहे. यातून आपला अधिकार इतर सभ्यतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींकडे सुपूर्द केला जाण्याची वृत्ती दिसून येते. माझ्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक आहे. पारंपरिक अधिकारांचे खच्चीकरण न करता आपल्या सभ्यतेचा पाया पुनर्जीवित आणि विकसित करण्यासाठी चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. यासाठी भारतविद्येच्या# (इंडॉलॉजी, Indology) पाश्चात्य अभ्यासकांबरोबर हातमिळवणी करताना आपण रणनीती आखणे तसेच त्यांच्याशी सुरक्षित अंतर राखून ठेवणे गरजेचे आहे.
२. विशेष प्राथमिकता लाभलेली पाश्चिमात्य सार्वभौमिकतेची विचारचौकट अनुसरणे
सध्या पाश्चात्त्य साधनांद्वारे विकसित विचारसरणी अनुसरण्यासाठी भारतीय विद्वानांना प्रशिक्षित करून त्यांचा वापर केला जाण्याची पद्धत सर्वत्र दिसून येत आहे; यासाठी कित्येक पाश्चात्त्य विचार आणि विचारवंत यांचा वर्षानुवर्षे अभ्यास करून त्यावर प्रभुत्व मिळवावे लागते. त्यामुळे भारतीय संस्कृती, सिद्धांत, परंपरा आणि संप्रदायांतून आढळून येणारी विचारसरणींची साधने बाजूला पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तथापि, भारतीय सभ्यतेतील रत्ने काबीज करून पाश्चात्त्य संपत्तीत बदलण्यात येत आहेत. मी याचा संबंध अमेरिकन डॉलर हे जगाचे राखीव चलन म्हणून वापरण्याशी लावतो. मी हे सुचवतो की आपण काही परिणामकारक संस्कृत अनुवाद-अयोग्य श्रेणी^, जागतिक बौद्धिक चलनाचा भाग म्हणून भविष्यासाठी तयार कराव्यात.
३. पौर्वात्यवादाची (ओरिएंटलिझम्, Orientalism) स्थिती
जरी शेल्डन पोलॉक यांच्या म्हणण्यानुसार आपण पौर्वात्योत्तर काळात राहत असलो तरीही माझे म्हणणे असे आहे की, तो जुना पौर्वात्यवादच आता अधिक प्रभावी अमेरिकन पौर्वात्यवादात रूपांतरित झाला आहे. जुन्या पौर्वात्यवादास मी १.० तर आधुनिक पौर्वात्यवादास २.० असे संबोधतो. आपणांस या विषयावर नक्कीच चर्चा केली पाहिजे की आज शिकवली जाणारी ‘भारतविद्या’ ही अभ्यासशाखा मुख्यत्वे नवीन आणि आधुनिक पौर्वात्यवादाचाच तर प्रकार नाही.
बौद्ध धर्माचा वापर हिंदू धर्माविरोधी हत्यार म्हणून करण्यास विरोध
४. बौद्ध धर्माचे हिंदू धर्माशी असणारे नाते
बौद्ध धर्म खरोखरच हिंदू धर्माच्या विरुद्ध आहे का? पाश्चात्य विद्वानांच्या सर्वसाधारण समजुतीनुसार बौद्ध धर्म खरोखरच वेदप्रामाण्य नाकारणारा होता का? पारंपरिक भारतीय स्रोतांपासून मिळालेले पुरावे सुचवतात की, या दोन्ही धर्मांमधील फरक अतिशयोक्तीने सादर करण्यात आला आहे. वास्तविक, हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख पद्धतींचा जन्म एकाच धर्मप्रेरणेतून झाला असून त्या सर्व समान धार्मिक ठेवा जपतात.
५. महत्वाच्या हिंदू ग्रंथांचा कालानुक्रम
ब्राह्मणांचे वर्चस्व आणि मौखिक परंपरेमुळे हिंदू धर्मात नाविन्य नव्हते या विचारांवर आधारित शोध प्रबंधांस बळकटी आणण्यासाठी अमेरिकन प्राच्यविद्या संशोधक, बौद्धमताने वेदप्रामाण्य नाकारल्यानेच हिंदू ग्रंथांत नाविन्य आले असे समजावू पाहतात. त्यासाठी ते व्याकरण, पूर्वमीमांसा, रामायण, इ. महत्वाच्या संस्कृत ग्रंथांचा कालानुक्रम सोयीनुसार बदलवून त्यांना बुद्धोत्तरकालीन ठरवतात. असे सर्व ग्रंथ हिंदू धर्माचे बौद्धमतास प्रत्युत्तर होते या दाव्यास ते याद्वारे पुष्टी देऊ इच्छितात.
६. प्राचीन भारतातील लेखनकला
अमेरिकन प्राच्यविद्या संशोधकांच्या दाव्यांनुसार, बुद्धोत्तरकालानंतर काही शतकांनी भारतात आलेल्या परकीय निर्वासितांनी व बौद्ध धर्म स्विकारलेल्यांनी भारतास लेखनकलेची ओळख करून दिली का? या संशोधकांकडून सांगण्यात येणारा भारतीय भाषा आणि संस्कृतीचा संपूर्ण इतिहास, सिंधू – सरस्वती सभ्यतांशी निगडीत उपलब्ध लेखन पुराव्यांना प्रमाण मानत नाही.
संस्कृत आणि त्यावर आधारित संस्कृतीच्या (विपर्यस्त) वर्णनास विरोध
७. मौखिक परंपरा
भारतीय मौखिक परंपरेचे महत्व नाकारणाऱ्या विद्वानमतांची आलोचना मी या पुस्तकातून केली आहे. मौखिक परंपरा केवळ भारतीय संस्कृतीच्या पूर्व उत्कर्षासाठीच महत्वाची नसून मानसशास्त्राच्या आगामी विकासासाठी तसेच शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत नवीन शाखा निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल असे मी स्पष्ट केले आहे.
८. भारतीय भाषांचा इतिहास
अमेरिकन प्राच्यविद्या संशोधक असे मानतात की संस्कृत ही परकीय निर्वासितांकडून भारतात आली असून तिची मूळ अनुवंशिक बांधणी आणि जडणघडण भारतीय प्रादेशिक भाषांपेक्षा वेगळी आहे. ते असा आरोप करतात की अंतिमत: संस्कृत भाषेने प्रादेशिक भाषांवर वर्चस्व मिळवले आणि त्यांवर एकाधिकारशाहीने नियंत्रण ठेवले. ही विवादास्पद धारणा भारतीयांना भाषिक आणि सामाजिक गटांच्या परस्पर संघर्षात ढकलणाऱ्या समकालीन सामाजिक सिद्धांतांमध्ये खोलवर झिरपली आहे. ही धारणा पारंपरिक मताविरोधी आहे ज्यानुसार संस्कृत आणि प्राकृत (जिच्यापासून प्रादेशिक भाषा विकसित झाल्या) हे एकमेकांवर आधारित दोन भाषिक प्रवाह असून त्यांच्या एकत्रित येण्याने ‘वाक्’ ही भाषण प्रणाली बनते असे मानले जाते.
९. संस्कृत व संस्कृतीतील उपजत सामाजिक अत्याच्यारांच्या आरोपांविषयी
अधिकाधिक पाश्चात्त्य प्राच्यविद्या संशोधकांनुसार संस्कृत आणि संस्कृतीने भारतातील स्त्रिया, दलित आणि मुस्लीमांशी नेहमीच दुर्व्यवहार व त्यांचे शोषण केले आहे. एखाद-दुसऱ्या घटनेस अनुसरून हा प्रकर्षाने संपूर्ण व्यवस्थेतीलच दोष मानण्यात आला आहे. असे आरोप केले जातात की संस्कृत व्याकरण, वैदिक ग्रंथ आणि शास्त्रे ही यामागची मुख्य कारणे असून; नियमांनी भरलेले हे ग्रंथ बौद्धिक स्वातंत्र्यास प्रतिबंध करतात. पारंपरिक विद्वानांनी जोरदार विरोध करावा असा हा दृष्टीकोन/मुद्दा आहे आणि आपण दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे.
१०. नवनिर्मितीचा अभाव असण्याच्या आरोपांविषयी
याव्यतिरिक्त करण्यात येणाऱ्या तथाकथित दाव्यानुसार वैदिक दृष्टीकोनांची झापडे लावल्या गेल्याने शास्त्रे खरीखुरी नवनिर्मिती करण्यास आणि व्यावहारिक (भौतिक) विकासास अटकाव करतात. तथापि, या दाव्याविरुद्ध पुष्कळ पुरावे उपलब्ध आहेत जे दाखवतात की भारतीयांनी भौतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांमध्ये मोठ्या खुबीने नवीन शास्त्रे निर्माण केली तसेच उपलब्ध शास्त्रांचा वापरही केला. त्यामुळे प्रायोगिक नाविन्य आणि सर्जनशीलतेच्या कमतरतेवरून शास्त्रांना नाकारले जाऊ शकत नाही.
११. संस्कृतला मृत मानण्याच्या आरोपाविषयी
संस्कृत सुमारे एक हजार वर्षांपूर्वीच मरण पावली आहे असे सांगणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांविरुद्ध मी मते मांडली आहेत. कृष्णशास्त्री आणि के. एस. कन्नन यांच्यासारख्या पारंपरिक विद्वानांचा संदर्भ मी दिला आहे जे या मुद्द्यावर चर्चा करू इच्छितात.
१२. संस्कृत आणि संस्कृती धर्मनिरपेक्ष बनवणे
शेल्डन पोलॉक यांचा गट संस्कृतला धर्मनिरपेक्ष बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कारण त्यांच्यामते यज्ञ, कर्मकांड, पूजा, तीर्थक्षेत्रे, व्रतवैकल्ये आणि इतर विविध साधना इ. सर्व आध्यात्मिक चालीरिती जुनाट, अंधश्रद्ध आणि शोषण करणाऱ्या आहेत. अशाप्रकारे पारमार्थिक किंवा आध्यात्मिकतेशी निगडीत सर्व पैलू बाजूला सारून केवळ लौकिक किंवा व्यावहारिक (सांसारिक) क्षेत्रावरच लक्ष केंद्रित करणे हा त्या गटाचा एक अत्यंत महत्वाचा हेतू आहे. पारंपरिक बाजूने विचार करणाऱ्यांसाठी हे आपल्या परंपरेच्या अखंडत्वाचे गंभीर उल्लंघन ठरते. अशा संकुचित धर्मनिरपेक्षतेला माझा दृढ विरोध आहे.
१३. संस्कृतातील काव्याला राजकीय अस्त्र ठरवण्याच्या आरोपाविषयी
अमेरिकन प्राच्यविद्या संशोधकांचा गट असे नेहमीच मानत आला आहे की काव्यांची (साहित्य) निर्मिती विशेषतः राजांसाठी केली गेली ज्यायोगे त्यांना प्रजेला आपल्या सत्तेच्या प्रभावाखाली ठेवता यावे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे याकडे राजाच्या सत्ताप्रसाराचे एक प्राचीन तंत्र म्हणून पाहण्यात येते. अशा संकुचित दृष्टीकोनाला नक्कीच विरोध केला गेला पाहिजे. काव्याला केवळ राजनीती पुरते मर्यादित ठेवता येणार नाही; त्याद्वारे धर्मनिरपेक्ष तसेच धार्मिक (पवित्र) क्षेत्रांतील सामान्य जनतेसाठी कित्येक सकारात्मक गोष्टी साध्य केल्या गेल्या आहेत.
१४. रामायण
राजांमार्फत केले जाणारे शोषणात्मक वर्चस्व चित्रित करणे म्हणजेच राजधर्माला दुर्व्यवहार करणारी शासन व्यवस्था दाखवणे हा रामायणाचा उद्देश आहे का? माझे विरोधक रामायणाकडे एका खऱ्याखुऱ्या आध्यात्मिक शोधयात्रेच्या स्वरूपात न पाहता एक राजकीय साधन म्हणून पाहतात. ते असे मानतात की आजतागायत रामायणाचा वापर मुस्लिमांविरोधी शस्त्र म्हणून केला जातो. तथापि, भक्तांचे विचार वेगळे आहेत. ते रामाकडे सर्व शासकांसाठीचा आदर्श म्हणून पाहतात.
संस्कृत आणि संस्कृतीवर पुनर्हक्क मिळवणे व त्यांना पुन:प्रस्थपित करणे
१५. भारतीय ग्रंथांमधून इंग्रजीत वाहणारा एकेरी ज्ञानप्रवाह
कित्येक शतकांपासून भारतीय भाषांमधील ग्रंथ इंग्रजीत अनुवादित करण्यात आले आहेत परंतु याउलट प्रवाह जवळपास अस्तित्वातच नाही. परिणामस्वरूप, केवळ इंग्रजीच बऱ्याच क्षेत्रांमधील शोध आणि संपर्काची ज्ञानभाषा बनली आहे. संस्कृतने इंग्रजीबरोबर तिच्या स्वत:च्या विचारसरणीने युक्त असे ज्ञानभांडाराचे साधन म्हणून योग्य स्थान मिळवायला हवे. याठिकाणी आपण चीनने त्यांच्या मॅण्डरीन भाषेसाठी तयार केलेल्या रणनीतीपासून शिकू शकतो.
१६. संस्कृतशी साधर्म्य असणाऱ्या इतर प्राचीन भाषा
पाश्चात्त्य विद्वान संस्कृतला वारंवार, ते ‘मृत’ समजत आलेल्या लॅटिन भाषेच्या आणि/किंवा अभिजात समजल्या गेलेल्या ग्रीक भाषेच्या गटात वर्गीकृत करतात. आधुनिक भारतीय विद्वान ‘मृत’ किंवा ‘अभिजात भाषा’ अशा तऱ्हेने केले गेलेले संस्कृतचे वर्गीकरण आंधळेपणाने मान्य करतात. पारंपरिक विद्वानांना हे मान्य नाही कारण संस्कृत आणि संस्कृती भूतकाळास नाकारून विकसित झालेली नाहीत तर भूतकाळाशी सातत्य ठेवून आहेत. त्यामुळे आपल्याला संस्कृतचा अभ्यास ग्रीक/लॅटिन भाषांच्या धर्तीवर होऊ न देता संस्कृतला मॅण्डरीन आणि पर्शियन भाषांच्या पंक्तीत बसवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ज्या आजही जिवंत (वापरात) असून आपापल्या भूतकाळाशी सातत्य ठेवून आहेत. आपण चर्चा करण्यासाठी अशा आशियाई देशांतल्या विद्वानांना निमंत्रित केले पाहिजे जिथे मॅण्डरीन, पर्शियन, अरेबिक, हिब्रू आणि जपानी भाषांना प्राधान्य दिले जाते आणि त्यांना प्राचीन तसेच आधुनिकही समजले जाते.
१७. संस्कृत अभ्यासाची व्यापकता
संस्कृत भाषा आणि त्यातील जुन्या ग्रंथांचा अभ्यास करण्याबरोबरच आधुनिक संशोधन क्षेत्रांतही संस्कृत श्रेणी व पद्धतींचा समावेश तसेच वापर करणे आवश्यक आहे. यात संगणकीय भाषाशास्त्र, परिसर अभ्यास, प्राणीहक्क, वाढत्या वयाची लोकसंख्या आणि कुटुंब व्यवस्था, मेंदू आणि मानसशास्त्र, शिक्षण आणि गतीने शिकण्याची कला (अॅक्सिलरेटेड लर्निंग, accelerated learning), गणित तसेच इतर वैज्ञानिक शाखा, आरोग्य विज्ञान अशा अनेक विषयांचा समावेश केला जाऊ शकतो. आपण सध्याची बौद्धिक मांडलिकत्वाची संस्था मोडायला हवी ज्यात संस्कृत अशा ज्ञानशाखांपासून वेगळी करण्यात येते, जिथे तिच्याच संपन्नतेची चोरी केली जाते व तिला पाश्चात्त्य नमुन्यांदाखल दाखवले जात पाश्चात्त्य ‘शोध’ म्हणत नवा इतिहास रचला जातो.
१८. हिंदुंविषयीचा नकारात्मक पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन (हिंदूफोबिया, Hinduphobia) उघडा पाडणे
जेव्हा एखादा विद्वान अल्लाहचे अस्तित्वच नाकारतो किंवा कुराण अस्सल ईश्वरवाणीचे प्रतिनिधित्त्व करत नाही असा दावा करतो किंवा मुहम्मद हे प्रेषित नव्हते असे मानतो तेव्हा त्यास इस्लामघृणा किंवा इस्लामविषयीचा भयगंड (इस्लामोफोबिया, Islamophobia) म्हटले जाते. हा आरोप तेव्हाही लावला जातो जेव्हा असा विद्वान ‘सकारात्मक’ गोष्टी सांगू पाहतो उदा. अरेबिक भाषा काव्यश्रीमंत आहे, कुराण मानवतेसाठी दीपस्तंभ (पथदर्शक दिवा) आहे, वगैरे. यांपैकी कुठलीही बाजू मुस्लीम मनास समाधान देऊ शकत नाही. एखादी विचारसरणी यहुदी विरोधी ठरताच अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते. पाश्चिमात्त्य शैक्षणिक दुहेरी मापदंडांपासून हिंदूंनी सावध राहिले पाहिजे कारण त्यांच्याप्रमाणेच आपल्या परंपरेविषयी समान संवेदनशीलता आणि अधिकाराने बोलण्याची परवानगी हिंदूंना नाकारण्यात येते. यामुळेच शेल्डन पोलॉक यांना धक्का बसला जेव्हा मी त्यांच्या कित्येक वैचारिक भूमिका हिंदू धर्मास हानिकारक (हिंदूफोबिक, Hinduphobic) असल्याचे दर्शवले. एखादे कृत्य, प्रकाशन, इस्लाम किंवा हिंदू भयगंडाने प्रेरित किंवा यहुदी विरोधी आहे हे दाखवण्यासाठी आपणांस बरोबरीच्या क्षेत्राची गरज आहे.
तळटीपा:
+ संस्कृती जोपासणारे:
संस्कृती जोपासणाऱ्या, संस्कृतीवर श्रद्धा असलेल्या विद्वानांसाठी ‘इनसायडर्स’ (insiders) तर भारतीय संस्कृतीचा अपरंपरागत दृष्टीने विचार करणाऱ्या, संस्कृतीवर श्रद्धा नसलेल्या विद्वानांसाठी ‘आऊटसायडर्स’ (outsiders) अशा संज्ञा पुस्तकात योजल्या आहेत. असे वर्गीकरण करत असताना विद्वानांची नागरिकता, धर्म, जात, वंश, लिंग अशा बाबी बाजूला सारून केवळ त्यांची विचारसरणी लक्षात घेतली गेली आहे. ज्याप्रमाणे सर्व पाश्चात्त्य विद्वान संस्कृतीविषयी अश्रद्ध नाहीत त्याचप्रमाणे सर्व भारतीय विद्वानही सश्रद्ध नव्हेत हे या पुस्तकात अधोरेखित करण्यात आले आहे.
# भारतविद्या (इंडॉलॉजी):
भारतीय संस्कृती व व्यापक अर्थाने आग्नेय आशियाच्या संस्कृतीचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा
^ संस्कृत अनुवाद–अयोग्य श्रेणी:
धर्म = religion, ईश्वर = God, आत्मन = soul, देवमुर्ती = idol, शक्ती = Holy Spirit, यज्ञ = sacrifice, शिव = destroyer, माया = illusion, मिथ्या = spurious, मोक्ष = salvation इ. भाषांतर सध्या प्रचलित असले तरी ते सुयोग्य नाही कारण ते मूळ शब्दाचा मथितार्थ किंवा त्यामागील भावना उलगडून दाखवण्यास सक्षम नाहीत.